World Schizophrenia Day 2024

World Schizophrenia Day 2024

World Schizophrenia Day 2024

स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराबद्दल समाजात बरेचसे गैरसमज आहेत. स्किझोफ्रेनिया हा आजार भूतबाधा, करणी, भानामती, जादूटोणा, यामुळे होत नाही, तर हा आजार मेंदूतील विशिष्ठ रसायनांमधील असमतोल झाल्यामुळे होतो. इतर आजारांप्रमाणे हा एक आजार आहे. स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) या आजाराने जगातील टक्का लोक आयुष्यात कधी ना कधी ग्रस्त होतात. अशा रुग्णांना भूतबाधा, करणी, लागीर, भानामती झाली असे समजून मंत्रिकांकडे / एखाद्या बाबाकडे घेऊन जाण्याचे प्रमाण खूप आहे. तेथे त्यांच्यावर अमानुष उपचार केले जातात.

समजून घ्यास्किझोफ्रेनिया

गैरसमजातून स्किझोफ्रेनियासारख्या मानसिक आजारात मारहाण करून, बांधून ठेवण्याचे प्रकार घडतात. पण अशामुळे आजार कमी होण्याऐवजी वाढतच जातो. त्यात बराच वेळ जातो व रुग्णाला आयुष्यभर औषधोपचारांची गरज पडते. यामुळे लवकरात लवकर बरे होण्यासाठी व आजारातून पूर्णपणे बरे होण्यासाठी लक्षणांची सुरुवात होताच मनोविकारतज्ज्ञांची भेट घेऊन सांगितल्याप्रमाणे उपचार पूर्ण करणे गरजेचे ठरते. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते या आजाराबाबत माहिती मिळवणे. ज्यामध्ये त्याची लक्षणे काय, तो कसा ओळखावा, त्याची कारणे काय तसेच त्यासाठी काय उपचार असतात, हे माहीत करून घेणे.

कारणे:

१. मेंदूमधील रासायनिक घटकांचा समतोल बिघडणे

२. अनुवांशिकता अनेक रुग्णामध्ये अनुवांशिकपणे झालेला आढळतो. आई/वडील किंवा जवळच्या नातेवाईकांना आजार असल्यास हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

३. बालपण/बाल अवस्थेत होणारा मानसिक आघात : बालपण कसे होते, कडक शिस्तीचे पालक, पालकातील भांडणे, एका पालकाचा मृत्यू किंवा घटस्फोट अशा परिस्थितीत बालपण असेल तर. लैंगिक शोषण किंवा मानसिक छळ झाला असेल तर या आजाराची शक्यता असते.

४. मानसिक ताण- तणाव : सामाजिक, आर्थिक किंवा अन्य कारणामुळे होणाऱ्या तणावामुळे किंवा एखादी खूप आनंदाची घटना घडल्यासही काहीजणांना असा आजार होऊ शकतो.

स्किझोफ्रेनियाचे विविध प्रकार त्याची लक्षणे

प्रकार १- पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया (छिन्न मानस)

१. कानात आवाजाचे भास होणे कोणतरी आपल्याशी किंवा आपल्याबद्दल बोलत आहे असे वाटणे. बहुधा ते वाईटच बोलतात किंवा आपल्याला शिवीगाळ करतात, असे आवाज असतात. त्यामुळे रुग्ण चिडचिडपणा करतो किंवा आक्रमक होतो. काही वेळा हे आवाज त्यांना एखादी गोष्ट करण्यासाठी सांगतात त्यामुळे रुग्ण त्या पद्धतीने वागतात जसे की तोडफोड करणे, एखाद्याला मारणे. काही वेळा हे आवाज त्यांना आत्महत्या करायला सांगतात. त्या भरात रुग्ण आत्महत्या करण्यासही मागेपुढे पाहात नाही.

२. मनात संशय येणे- कोणीतरी आपल्याविरुद्ध आहे, कोणीतरी आपल्याला किंवा घरच्यांना मारेल असा संशय वाटणे. सर्व लोक माझ्याबद्दल बोलतात असे वाटणे. माझ्या घरामध्ये कॅमेरा लावलेला आहे, माझ्या मागे पोलीस आहेत. कोणीतरी करणी केली आहे, काळी जादू, मूठमाती केली आहे असा संशय येतो किंवा काही वेळा

पत्नी किंवा पतीचे बाहेर संबंध आहेत असे संशय घेतो.

प्रकार २ : डिसऑर्गनाईज्ड स्किझोफ्रेनिया

(छिन्न मानस)

१) असंबद्ध बडबड करणे. रुग्ण काहीही बडबड करतो. त्याचा वास्तवाशी संबंध तुटल्यामुळे तो काहीही विचित्र बोलतो. एक प्रश्न विचारला असता दुसरेच काहीतरी उत्तर देतो किंवा सर्व प्रश्नाला तेच ते उत्तर देतो. एकच शब्द / वाक्य सारखा सारखा बोलतो. आपण जे विचारतो तेच तेच वाक्य परत बोलतो. नवीन नवीन शब्द बोलतो किंवा वेगळ्या भाषेत बोलल्यासारखे बोलतो.

२) असंबध्द वागणे / विचित्र वागणे रुग्ण स्वतःची काळजी घेत नाहीत. आंघोळ करत नाहीत, कपडे बदलत नाहीत, दाढी किंवा केस कापत नाहीत. कचरा गोळा करतात. कपडे घालत नाहीत, काढून टाकतात. लोकांत कसे बोलावे कसे वागावे हे त्यांना कळत नाही. एकटे असताना किंवा स्वतःशी बडबड करतात, हातवारे किंवा विचित्र हावभाव करत राहतात. (रस्त्यावर अशा अवस्थेत फिरणारे बरेच लोक गरीब किंवा भिकारी नसून ते या आजाराचे रुग्ण असतात.)

प्रकार ३ – कॅटाटोनिक स्किझोफ्रेनिया (गलितगात्र (छिन्न मानस) )

१. शारीरिक हालचाल खूप कमी होते किंवा वाढते. ज्यावेळी हालचाल कमी होते त्यावेळी रुग्ण स्तब्ध बसून राहतो. काही हालचाल करत नाही. एखाद्या स्थितीत बराच वेळ बसून राहतो किंवा पुतळ्यासारखा थांबून राहतो. ज्यावेळी हालचाल

वाढते त्यावेळी विनाकारण इकडे तिकडे पळत राहतो किंवा कृती करत राहतो.

२. रुग्ण काहीच बोलत नाही. अगदीच शांत राहतो.

३. एकच कृती वारंवार करतो. विशिष्ठ लकब, विशिष्ट पद्धतीची हालचाल किंवा कृती विनाकारण व सतत करत राहतो. चेहऱ्यावर विशिष्ट हावभाव करतो.

४. समोरचा जे बोलेल तेच वारंवार बोलतो किंवा कृती करेल तीच कृती वारंवार करतो.

उपचार:

१. औषधोपचार: विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज अनेक चांगली औषधे उपलब्ध आहेत. लवकरात लवकर, वेळीच व सल्ल्याप्रमाणे उपचार पूर्ण केल्यास रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात किंवा त्यांचा आजार पूर्णपणे काबूत राहू शकतो.

२. विद्युत लहरी उपचार (ECT): तीव्र प्रकारच्या आजारामध्ये जेंव्हा पेशंट मारामारी करत असेल, स्वतःला किंवा दुसऱ्याला अपाय करत असेल, आत्महत्या करायचा प्रयत्न करत असेल किंवा औषधोपचाराने बरा होत नसल्यास विद्युत लहरी उपचार केला जातो. ही एक अतिशय सुरक्षित व प्रभावी उपचार पद्धती आहे.

३. मानसोपचार / समुपदेशन : औषधोपचाराने रुग्ण बरा झाल्यानंतर रुग्ण पूर्ववत होण्यास मानसोपचार व समुपदेशन केले जाते. कुटुंबाचे समुपदेशन करणेही तेवढेच महत्त्वाचे असते. तसेच रुग्ण पूर्ववत व्हावा व त्याने चांगले आयुष्य जगावे म्हणून त्याचे व्यावसायिक पुनर्वसन करणे आवश्यक असते.

स्किझोफ्रेनियाचे रुग्ण हे पण तुमच्या-आमच्यासारखीच माणसे आहेत. त्यांना सन्मानाची वागणूक द्या. फक्त मानसिक आजार आहे म्हणून त्यांना ‘मेंटल’ म्हणून संबोधू नका, हिणवू नका. मनोरुग्णाला त्याच्या गरजेनुसार उपचार व आधार द्या. त्यांचे कोणीही मानसिक, शारीरिक, लैंगिक शोषण करणार नाही याची काळजी घ्या. समाजात सन्मानाने जगण्यासाठी त्यांना योग्य व्यवसायोपचार मार्गदर्शन व आधार देऊन स्वतःची ओळख निर्माण करायला मदत करा, स्वतःच्या पायावर उभे राहायला व समाधानी, आशादायक आयुष्य जगायला मदत करा.

डॉ. चंद्रशेखर हळिंगळे (M.B.B.S., D.P.M.)

मानसोपचार आणि व्यसनमुक्तीतज्ज्ञ निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्र, मिरज.

 

 

Leave a Reply